प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून भारतीय हद्दीत नऊ किलोमीटर अंतरावरील दौलत बेग ओल्डीपर्यंत येऊन पोहोचलेल्या चिनी लष्करी तुकडय़ांचा इतक्यात तरी माघारी फिरण्याचा इरादा नाही. बीजिंगमधील नेत्यांच्या आदेशानंतरच पुढे काय करायचे ते ठरेल असे लष्करी तुकडीच्या कमांडर्सनी सांगितल्याने बुधवारी झालेली तिसरी ध्वजबैठक निष्फळ ठरली. भारतीय लष्कराने लडाख क्षेत्रातील फुकचे आणि चुमार भागात उभारलेली ठाणी मोडीत काढावीत अशी नवीच मागणी चिनी लष्कराने या वेळी केली, हे विशेष.
दौलत बेग ओल्डी भागात केलेल्या घुसखोरीने भारत-चीन सीमेवर निर्माण झालेला पेचप्रसंग हाताळण्यासाठी दोन्हीकडील स्थानिक लष्करी कमांडर्सच्या यापूर्वी दोन ध्वजबैठका झाल्या. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. बुधवारी पुन्हा तिसरी बैठक झाली. मात्र, ही बैठकही निष्फळ ठरली. दौलत बेग ओल्डीतून माघार घेण्याऐवजी चिनी लष्कराने आता लडाखमधील फुकचे आणि चुमार या भागांतील लष्करी ठाणी भारताने मोडीत काढावीत अशी नवी मागणी केली आहे. चीनची ही मागणी भारताने फेटाळून लावल्याने सीमेवरील पेचप्रसंग ‘जैसे थे’च असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी बुधवारी दिली. चीनचा आडमुठेपणा कायम असला तरी ९ मे रोजी चीनच्या दौऱ्यावर जाण्याचा आपला इरादा पक्का असल्याचेही खुर्शीद यांनी या वेळी स्पष्ट केले.
फुकचे आणि चुमारमध्ये काय आहे?
चीनच्या सीमेशी लागून असलेल्या लडाख क्षेत्रात भारतीय सरहद्दीत फुकचे आणि चुमार ही दोन ठाणी आहेत. या ठिकाणी भारतीय लष्कराने पत्र्याच्या दोन शेड्स टाकून तंबू उभारले आहेत. या ठिकाणी सातत्याने गस्त घालावी लागते व येथील हवामान प्रचंड बर्फाळ असते, त्यामुळे गस्तीवरील सैनिकांचे हवामानापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने हे तंबू भारतीय लष्कराने उभारले आहेत. चिनी लष्कराने हे तंबूच मोडीत काढून टाकण्यास सांगणे म्हणजे या भागातील गस्तीच भारताने थांबवावी असेच चीनला अप्रत्यक्षरीत्या सुचवायचे असून, हा भारताच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आडमुठेपणा कायम
दौलत ओल्डी बेगमधून माघार घेण्याच्या भारतीय लष्कराच्या मागणीकडे मात्र चिनी लष्कराने साफ दुर्लक्ष केले आहे. बीजिंगमधील नेत्यांच्या आदेशानंतरच पुढे काय करायचे ते ठरवले जाईल असे चिनी लष्कराने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर दौलत ओल्डी बेगमध्ये ज्या ठिकाणी चीनने तंबू ठोकले आहेत त्या समोरील बाजूस भारतीय लष्कराने ठोकलेले तंबू त्यांनी मोडावेत आणि माघारी परतावे असेही चिनी लष्कराने सुचवले आहे. त्यातून चीनचा आडमुठेपणा कायम असल्याचेच अधोरेखित होत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सीमेवर आयोजित कार्यक्रमात दोन्ही देशांचे जवान व लष्करी अधिकारी सहभागी होणार असून त्या वेळी पुन्हा एकदा चर्चेची फेरी केला जाणार आहे.
पंतप्रधान पेचात
बीजिंगमधील नेत्यांच्या आदेशानंतरच दौलत बेगमधील पेचप्रसंगाचा पुनर्विचार करू असे चिनी लष्कराने स्पष्ट केल्याने हा पेचप्रसंग दोन्ही देशांच्या लष्कराच्या स्थानिक कमांडर्सच्या चर्चेतून सोडवण्यात चीनला रस नसल्याचेच स्पष्ट होत आहे. चिनी लष्कराच्या या भूमिकेमुळे भारतीय हद्दीत चिनी लष्कराने केलेली घुसखोरी हा स्थानिक प्रश्न असल्याचे सांगणारे पंतप्रधान मनमोहन सिंग पेचात सापडले आहेत.
लष्करप्रमुखांची मंत्रिमंडळाशी चर्चा
चिनी लष्कराच्या घुसखोरीबाबत लष्करप्रमुख जन. विक्रम सिंग यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती दिली. हा तिढा सोडविण्यासाठी लष्कराने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, त्याबाबतही सिंग यांनी मंत्रिमंडळाला माहिती दिली.या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी देशासमोर कोणते पर्याय आहेत, त्याबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंगळवारीही दोन्ही देशांच्या ब्रिगेडिअर पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली होती. भारत आणि चीनमध्ये जो करार करण्यात आला आहे त्याचे पालन करून चीनने आपले सैन्य बिनशर्त मागे घ्यावे, असेही या बैठकीत भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.